औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार खासदार चंद्रकांत खैरे

Foto

औरंगाबाद - भाजपशासित राज्यात जिल्ह्यांचे नाव बदलण्याचे लोण पसरले असताना औरंगाबादचे संभाजीनगर करण्याची शिवसेनेची ३० वर्षांची मागणी युती सरकारच्या काळातही थंड बस्त्यात पडून आहे. भाजप आणि शिवसेना नेत्यांच्या श्रेयवादात हा प्रश्न प्रलंबित असल्याची चर्चा आहे. आता लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शहराच्या नामांतराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत येणार असे दिसत आहे. शहराच्या नामांतरासाठी खासदार खैरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. 


उत्तर प्रदेशातील भाजपा सरकारने नुकतेच फैजाबादचे अयोध्या आणि अलाहाबादचे प्रयागराज असे नामांतर केले. यापूर्वी मायावती मुख्यमंत्री असतांनाही  अनेक जिल्ह्यांना राष्ट्रपुरुषांची नावे देण्यात आली. पण गेल्या तीस वर्षापासून औरंगाबाद जिल्ह्याचे नाव संभाजीनगर करण्यात शिवसेना आणि भाजपाच्या नेत्यांना अपयश आले आहे. शिवसेना-भाजप नेत्यांच्या श्रेय वादात शहराचे नामांतर अडकले असल्याची चर्चा आता सुरु झाली आहे. खासदार चंद्रकांत खैरे यांनी या प्रश्‍नी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे सांजवार्ता ऑनलाईनशी बोलताना सांगितले. तर आमदार अतुल सावे सरकारकडे पाठपुरावा करणार आहेत. 

 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबाद येथे 8 मे 1988 साली झालेल्या जाहीर सभेत औरंगाबादचे नाव यापुढे संभाजीनगर होणार अशी घोषणा केली, त्यानंतर हे प्रकरण न्यायप्रविष्ठ झाले. उच्च न्यायालयानंतर सर्वोच्च न्यायालयात गेले. सर्वोच्च न्यायालयाने त्यास स्थगिती दिली. तेव्हापासून नामांतराचे प्रकरण थंड बस्त्यात पडून आहे. पण आता लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका जवळ येत आहे. त्यामुळे औरंगाबादचे संभाजीनगर व उस्मानाबादचे धाराशीव करण्याचे प्रयत्न पुन्हा सुरु झाले आहेत. दोन्ही जिल्ह्यांच्या नामांतराची मागणी शिवसेनेने केले असल्याने भाजप नेते  या प्रश्‍नावर गांभीर्याने चर्चा करत नाहीत. उत्तर प्रदेशात मात्र भाजपाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अलाहाबादचे प्रयागराज आणि फैजाबादचे अयोध्या असे नामांतर केले. यानंतरही अनेक जिल्ह्यांचे नामांतर केले जाणार असल्याचे उत्तर प्रदेशातील भाजपचे फायर ब्रँड नेते संगीत सोम यांनी म्हटले आहे. भाजपशासित राज्यात जिल्ह्यांचे नाव बदलण्याचे लोण पसरले असताना महाराष्ट्रात युती सरकार मात्र नामांतरासाठी उत्सुक असल्याचे दिसून येत नाही. 

 

मुख्यमंत्र्यांना भेटणार – खासदार खैरे

औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करण्याची घोषणा शिवसेनाप्रमुखांनी 1988 साली केल्यापासून आम्ही संभाजीनगरच उल्लेख करतो. पण शासन स्तरावर नामांतर व्हावे यासाठी आपण मुख्यमंत्र्यांना चार वेळेस भेटलो. यानंतरही आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार असल्याचे खा. खैरे यांनी सांगितले. 

 

पाठपुरावा करु – आमदार सावे

औरंगाबादचे नामांतर झाले पाहिजे ही येथील बहुतांश जनतेची मागणी आहे. पण सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असले तरी या प्रकरणी आपण सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे आ. अतुल सावे यांनी सांजवार्ता प्रतिनिधीला सांगितले.